नागपुरात कोरोना संशयित रुग्णांची संख्या २३

अमेरिकेतून नागपुरात आलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचे नमुने बुधवारी पॉझिटिव्ह येताच खळबळ उडाली. या रुग्णाच्या अत्यंत जवळून संपर्कात आलेल्या १५ संबंधितांना गुरुवारी मेयो, मेडिकलमध्ये दाखल करून त्यांचे नमुने घेण्यात आले. यासह दुबई, स्वीडन, अमेरिका व जर्मनीवरून आलेल्या आठ असे एकूण २३ संशयित रुग्णांना मेयो व मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. यातील आठ संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरितांच्या नमुन्यांचा अहवाल शुक्रवारी प्राप्त होणार आहे.अमेरिका प्रवासातून संबंधित व्यक्ती ६ मार्च रोजी नागपुरात आली. प्रकृती खालावल्याने ते बुधवारी मेयोमध्ये दाखल झाले. याच दिवशी त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले. अहवालात त्यांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. याची दखल मनपा आरोग्य विभागाने घेतली. रुग्णाच्या जवळून संपर्कात आलेल्या १५ जणांची यादी तयार केली. यात सासरे, आई-वडील, पत्नी, मुले, मित्र, त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी व ज्या डॉक्टरांकडून त्यांनी तपासणी केली त्या दोन डॉक्टरांचा समावेश आहे. यातील १३ संबंधितांना मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये तर दोन डॉक्टरांना मेयोच्या वॉर्ड क्र. २४ मध्ये दाखल करण्यात आले. या सर्वांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यातील दोन डॉक्टर व त्यांच्या सासऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उर्वरित १२ संबंधितांचा अहवाल शुक्रवारी प्राप्त होणार आहे. याव्यतिरिक्त मेडिकलमध्ये बुधवारी रात्री दाखल झालेली जर्मनी येथील एक महिला व दुबई येथून प्रवास करणाºया व्यक्तीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. मेयोमध्ये संशयित म्हणून भरती असलेले स्वीडन, अमेरिका व दुबई येथून प्रवास करून आलेल्या चार संशयितांचे नमुनेही निगेटिव्ह आले आहेत. या सर्वांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. असे असले तरी, पुढील १४ दिवस आरोग्य विभाग त्यांच्याशी संपर्कात राहणार आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली जाणार आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर

मेयोचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची एक चमू त्यांच्यासोबत आहे. रुग्णाच्या सेवेत असलेल्यांना विशेष ‘गाऊन’ आणि ‘एन-९५’ मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मेडिकलमध्ये मदत कक्ष सुरू

मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे म्हणाले की, कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यांना मदत व्हावी यासाठी अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभाग व अतिदक्षता विभागाच्या समोर अशा तीन ठिकाणी मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. याची मदत संशयित रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांना होणार आहे.

१५ संशयितांचे नमुने आज

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांनी सांगितले, १५ संशयित रुग्णांचे नमुने उशिरा मिळाल्याने शुक्रवारी त्याचा अहवाल प्राप्त होईल. तोपर्यंत त्यांना नियमानुसार रुग्णालयात थांबावे लागणार आहे.

पॉझिटीव्ह रुग्णाचे दोन्ही मुले निगेटिव्ह 

कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाचा मुलगा आणि मुलगी दोन्ही निगेटिव्ह आल्याचे पुष्टी रात्री उशीरा विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी केली. यामुळे त्यांच्या शाळा-कॉलेज प्रवेशाला घेऊन गुरुवारी उडालेला गोंधळ आतातरी शांत होईल, लोक समजून घेतली अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Posts

1 Comment

Comments are closed.